हैदराबाद : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गर्भपाताचं प्रमाण हिंदूंमध्ये जास्त असल्याचं वादग्रस्त वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. तसेच हिंदूमध्ये महिलांना हुंड्यासाठी मारलं जातं, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी 2001 च्या जनगणनेचा आधार घेतला आहे.
ओवेसी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. ओवेसी महिलाविरोधी असल्यानं त्यांनी असं वक्तव्य केल्याचं भाजपने म्हटलं आहे.
ओवेसी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "2001 च्या जनगणनेनुसार गर्भपाताचं प्रमाण हिंदूमध्ये जास्त दिसून येत आहे. आत्महत्या करणाऱ्या, निराश्रित महिलांचे प्रमाणही हिंदूमध्ये जास्त आहे. हिंदूमध्ये हुंड्यासाठी महिलांच्या छळाचं प्रमाणही जास्त आहे." तीन तलाकबाबतच्या सरकारच्या अध्यादेशामुळे मुस्लीम महिलांना कोणताही फायदा होणार नसल्याचं ओवेसींनी म्हटलं आहे.
ओवेसींच्या वक्तव्यावर भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ओवेसी यांची मानसिकता यातून समोर आली आहे. ओवेसींचे विचार मागास आणि महिलाविरोधी आहेत. कट्टरतावादी मानसिकतेने त्यांच्या डोळ्यावर झापडं लागली आहेत. 84 टक्के लोकसंख्येची तुलना 15 टक्क्यांहून कमी लोकसंख्येशी करणं निराधार असल्याचं तेलंगणाचे भाजप प्रवक्ते कृष्णसागर राव यांनी म्हटलं आहे.