नवी दिल्ली : नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी दिली आहे. भाजपमधून आलेल्या तीन आणि काँग्रेसमधून आलेल्या तीन नेत्यांना आम आदमी पार्टीनं उमेदवारी जाहीर केली आहे.
आम आदमी पार्टीनं ब्रह्म सिंह तंवर, अनिल झा आणि बीबी त्यागी या भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. चौधरी जुबेर, वीर सिंह धिंगान आणि सुमेश शौकीन या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना आपनं उमेदवारी दिली आहे.
ब्रह्म सिंह तंवर हे भाजपचे आमदार होते, त्यांनी ऑक्टोबर महिन्यात आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तंवर महरौली आणि छतरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते. ते तीन वेळा नगरसेवक देखील राहिले होते. अनिल झा किराडी येथून आमदार होते. पूर्वांचलमधील मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप सोडून आपमध्ये प्रवेश केला होता. बीबी त्यागी दोन वेळा नगरसेवक होते, पूर्व दिल्लीच्या लक्ष्मीनगर आणि शकरपूरमध्ये त्यांचा प्रभाव आहे.
चौधरी जुबेर हे काँग्रेसच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत. ते त्यांची पत्नी शगुफ्ता चौधरी यांच्यासह आपमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसचे तीन वेळा आमदार असलेले वीर सिंह धींगान हे खादी ग्रामोद्योग आणि एससी-एसटी बोर्डाचे अध्यक्ष होते. काँग्रेसचे माजी आमदार सुमेश शौकीन तीन वेळा सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.
आपनं कोणत्या नेत्यांना उमेदवारी जाहीर केली?
1.छतरपूर - ब्रह्मा सिंह तंवर
2. किराडी- अनिल झा
3. विश्वासनगर- दीपक सिंघला
4. रोहतास नगर- सरिता सिंह
5. लक्ष्मी नगर- बी.बी. त्यागी
6. बदरपूर- राम सिंह नेताजी
7. सीलमपूर- जुबैर चौधरी
8.सीमापुरी- वीर सिंह धींगान
9. घोंडा- गौरव शर्मा
10. करावल नगर- मनोज त्यागी
11. मटियाला-सोमेश शौकीन
दरम्यान, नवी दिल्ली विधानसभेची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपण्यापूर्वी विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात. नवी दिल्लीत जानेवारी महिन्यात निवडणूक लागू शकते. त्या दृष्टीनं अरविंद केजरीवाल यांनी तयारी सुरु केली आहे. आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तिरंगी सामना होऊ शकतो.
इतर बातम्या :
ठाण्यात एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंची मनसे महागात पडणार?; नागरिकांची बेधडक उत्तरं, पाहा VIDEO