Leopard: बिबट्याचं नाव काढताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण बिबट्या समोर आला की तो एखाद्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. आजकाल पर्यावरणाचा ऱ्हास आणि जंगलतोड होत असल्याने अनेकदा हेच बिबटे शिकारीसाठी मानवी वस्तीत प्रवेश करताना दिसतात. बिबट्याने माणूस, प्राणी यांच्यावर हल्ला केल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्या आहेत. पण चक्क बिबट्याचीच शिकार करून त्याला शिजवून खाल्ल्याची घटना नुकतीच ओडिसामध्ये घडलीय. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...


बिबट्याची शिकार करून शिजवून खाल्ल्याची धक्कादायक घटना


ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बिबट्याची शिकार करून नंतर त्याला चक्क शिजवून खाण्यात आलं आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली असून वनविभागाकडून बिबट्याचे शीर जप्त करण्यात आले आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


नुआपाडा जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेबद्दल बोलायचं झालं तर, माहितीनुसार, देवधरा गावाजवळील जंगलात रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. यावेळी पुस्तम चिंदा (58) आणि हृषिकेश चिंदा (40) या दोघांनी या बिबट्याला ठार मारले, त्याची कातडी कापली आणि मांस शिजवून खाल्ल्याचा आरोप आहे.


बिबट्याचे कातडे, डोके आणि शिजवलेले मांस जप्त 


वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, वन अधिकाऱ्यांनी आरोपींच्या अड्ड्यावर छापा टाकला, ज्यामध्ये बिबट्याचे कातडे, डोके आणि शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. मात्र, त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. खारीर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक मोहम्मद मुस्तफा सालेहा यांनी सांगितले की, तपास सुरू असून अटक आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. विशेष पथके फरार आरोपींच्या शोधात व्यस्त आहेत.


वनविभागाकडून कळकळीचे आवाहन


वनविभागाने स्थानिक समुदायांना वन्यजीव संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अशा घटनांची त्वरित माहिती अधिकाऱ्यांना द्यावी असे सांगण्यात आले आहे. बिबट्यासारख्या लुप्तप्राय प्रजातींच्या शिकारीमुळे या प्रजातींची ओळखच नष्ट होत चाललीय, तसेच पर्यावरण संतुलनावरही याचा परिणाम होताना दिसतोय. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.