Cheetah Helicopter Crash : भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर आज (16 मार्च) अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल भागात क्रॅश झाले. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. अपघातानंतर दोन्ही पायलट बेपत्ता झाले होते. त्यानंतर लष्कर, सशस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) ची पाच पथके शोधासाठी पाठवण्यात आली होती. मांडला येथील बांगलाजप गावाजवळ हेलिकाॅप्टरचे अवशेष सापडले. दरम्यान, या दुर्घटनेची कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अपघाताचे कारण शोधले जाईल. तत्पूर्वी, संरक्षण प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ सकाळी लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगितले होते. 


हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटांसह दोन लष्करी अधिकारी होते. लष्कराने सांगितले की, चित्ता हेलिकॉप्टर सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सांगे गावातून उड्डाण करून आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील मिसामरी येथे जात होते. त्यामध्ये एक लेफ्टनंट आणि एक मेजरही होते. लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) चा या हेलिकॉप्टरशी सकाळी सव्वा नऊ वाजता संपर्क तुटला, जे ऑपरेशनल फ्लाइटवर होते.


मंडलाजवळ अपघात झाला


बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याचे त्यांनी सांगितले. शोध आणि बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली होती. विशेष तपास शाखेचे पोलिस अधीक्षक रोहित राजबीर सिंह यांनी सांगितले की, दिरांगमधील ग्रामस्थांनी क्रॅश झालेले हेलिकॉप्टर जळताना पाहिले आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ते म्हणाले की, दिरांगमधील बांगजलेपच्या ग्रामस्थांनी साडेबारा वाजता हेलिकॉप्टर जळताना पाहिले. ते म्हणाले की त्या भागात 'मोबाइल कनेक्टिव्हिटी' नाही आणि इतके धुके पसरले आहे की दृश्यमानता केवळ पाच मीटरपर्यंत कमी झाली आहे. संध्याकाळी उशिरा लष्कराने सांगितले की, दोन्ही वैमानिकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.


ऑक्टोबर महिन्यात देखील झाला होता अपघात


गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर 'चित्ता'चा अपघात झाला होता. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता. तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला होता. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाला होता. 


पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश


गेल्या पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही माहिती 17 डिसेंबरला लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य संरक्षणमंत्री अजय भट्ट यांनी दिली, 2017 ते 2021 या कालावधीत तब्बल 15 दुर्घटना झाल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या