नवी दिल्ली : “स्विस बँकेत जमा झालेला सगळाच पैसा हा टॅक्स चोरी करून किंवा अनधिकृतपणेच जमा केलेला आहे, असं म्हणता येणार नाही,” असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यावर अरुण जेटलींकडून त्यावर उत्तर दिले गेले.


याबाबत अरुण जेटलींनी एक लेख लिहित सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जेटली म्हणाले,भारतीयांनी भारताबाहेर ठेवलेला पैसा अनेक श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. त्यामध्ये अनेक एनआरआय तसंच मूळ भारतीय वंशाचे असलेल्या पण सध्या विदेशी पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तींनीही जमा केलेल्या पैशाचाही समावेश आहे. तर काहींनी अधिकृतपणे आपला पैसा स्विस बँकेत ठेवला आहे.

त्यामुळे आता फक्त जे भारतात राहुन पैसा बाहेर पाठवत आहेत, अशांवरच कारवाई करण्याची गरज आहे.

जेटलींनी लिहिलंय, “अनधिकृतपणे पैसा जमा होण्याबाबत स्वित्झर्लंडची स्थिती आजही पहिल्यासारखीच आहे. स्वित्झर्लंडने भारताबरोबर एक करार केला आहे, ज्यानुसार भारतीयांकडून तिथे जमा होणाऱ्या पैशाचे आकडे 2019 पासून स्वित्झर्लंड भारताला कळवणार आहे.”

काय आहे स्विस बँकेची नवी आकडेवारी?

स्विस नॅशनल बँकेच्या आकडेवारीनुसार, मागच्या एका वर्षात या बँकेत भारतीयांकडून जमा करण्यात आलेल्या पैशात 50 टक्कांची वाढ झाली आहे. ही रक्कम सुमारे सात हजार कोटींवर पोहोचली आहे. 13 वर्षांनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.

राहूल गांधींची सरकारवर टीका

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी ब्लॅकमनीबाबत केलेल्या वक्तव्यांची आठवण करुन देत सरकारवर जोरदार टीका केली. राहूल गांधीनी ट्वीट करत म्हटलंय की, “2014 मध्ये ते म्हणत होते, स्विस बँकेतून काळपैसा परत आणला जाईल आणि प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू. 2016 मध्ये ते म्हणाले, नोटबंदीने काळापैसा नष्ट होईल. आणि आता 2018  मध्ये ते म्हणतात, भारतीयांच्या स्विस बँकेतील व्हाईटमनीत 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. स्विस बँकेत काळपैसाच नाही.”