नवी दिल्ली: जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास सहकारी बँकांना कदापि परवानगी देणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ठणकावून सांगितलं. ते आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याशिवाय देशभरातील 22,500 एटीएममध्ये नव्या नोटा आजपासून उपलब्ध होतील, असंही जेटली म्हणाले.
जिल्हा बँकांना नोटा बदलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना केली होती. मात्र केंद्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.
आता लग्नासाठी बँकेमधून अडीच लाख काढता येणार!
सहकारी बँकांना नोटा बदलण्याची परवानगी दिली तर या बँका काळा पैसा पांढरा करण्याचं केंद्र बनतील, असा दावाही जेटलींनी केला.
रिझर्व्ह बँकेनं १४ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ही बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांचं जाळं नाही. त्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी कोर्टात याचिकाही टाकण्यात आलीय. शिवाय काल शिवसेनेनं यासंदर्भात राष्ट्रपतींकडे मागणी केली. मात्र सरकारनं सर्वांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
अडीच हजार रुपयेच बदलण्याची मुभा
चलन तुटवड्यामुळं लोकांचे होत असलेले हाल कमी करण्याचे जोरदार प्रयत्न सरकारनं सुरु केलेत. त्याचाच भाग म्हणून एकावेळी साडेचार हजारांऐवजी फक्त 2500 रुपयांच्याच नोटा बदलण्याची मुभा असणार आहे.
केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली.
तर दुसरीकडे शेतकरी आणि लग्नघरांनाही दिलासा देण्यासाठी केंद्रानं महत्वाचे निर्णय़ घेतलेत.
ज्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना एका आठवड्यात बँकेतून 25 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
तसंच ही मर्यादा पीकाप्रमाणं लवचिक असेल. तसंच बाजारात किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातूनही पैसे अदा करण्याची परवानगी असेल.
तर ज्यांच्या घरी लग्नसराई आहे, त्यांना अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. मात्र त्यासाठी पॅन कार्ड आणि लग्नपत्रिका अत्यावश्यक असणार आहे.