नवी दिल्ली : प्रकृतीच्या कारणामुळे नव्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नका, अशी विनंती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र अरुण जेटली यांनी ट्विटरवर पोस्ट केलं आहे. मागील 18 महिन्यांपासून माझी प्रकृती खालावलेली आहे. अशा परिस्थितीत मी जबाबदारी पेलू शकणार नाही. त्यामुळे मला मंत्री बनवण्याबाबत कोणताही विचार करु नका, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी उद्या (29 मे) गुरुवारी पंतप्रधानपदाची पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत. शपथविधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मंगळवारी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यात पाच तास बैठक झाली. त्यामुळे या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता आहे.

अरुण जेटलींचं पंतप्रधान मोदींना पत्र


"मागील 18 महिन्यांपासून मी अतिशय गंभीर आजाराने ग्रस्त आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर तुम्ही जेव्हा केदारनाथला जात होता, तेव्हा मी तुम्हा औपचारिकरित्या म्हटलं होतं की, प्रकृतीच्या कारणांमुळे मी भविष्यात कोणतीही जबाबदारी पेलण्यास समर्थ राहणार नाही. मला माझ्या उपचार आणि प्रकृतीवर लक्ष द्यायचं आहे. भाजप आणि एनडीएने तुमच्या नेतृत्त्वात शानदार विजयाची नोंद केली आहे. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे."

'तुम्हाला औपचारिकरित्या विनंती करण्यासाठी हा पत्र प्रपंच केला आहे. मला माझ्या उपचार आणि आरोग्यासाठी आवश्यक वेळ हवी आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये मला कोणतीही जबाबदारी देऊ नये. यामुळे माझ्याकडे निश्चितच पुरेसा वेळ असेल. ज्यात मी अनौपचारिकरित्या सरकार किंवा पक्षात सहकार्य करु शकतो.

जेटलींना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर
मागील वर्षी मे महिन्यात अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांच्या उजव्या पायात सॉफ्ट टिश्यू कॅन्सर झाला. त्याच्यावरील शस्त्रक्रियेसाठी ते याच वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेत गेले होते. किमोथेरपीमुळे अरुण जेटली फारच अशक्त झाले आहेत. मागील आठवड्यात म्हणजेच 23 मे रोजी त्यांना एम्समधून डिस्चार्ज मिळाला होता.