नवी दिल्ली : तुमच्या पगारातून किती टीडीएस कापला जातो, याची माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. नोकरदार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने ही सुविधा सुरु केली असून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एसएमएस अलर्ट सेवेचं अनावरण केलं आहे.


कंपनीने तुमच्या पगारातून नेमका किती टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) कापला याची माहिती प्रत्येक तिमाहीनंतर मिळणार आहे. आयकर विभागाकडून एसएमएसच्या माध्यमातून करदात्यांना टीडीएस कपातीविषयी सूचना मिळेल.

काहीवेळा कंपनी कर्मचाऱ्यांचे करापेक्षा जास्त पैसे कापते. मात्र याची माहिती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना मिळायची. मात्र आता या प्रकाराला चाप बसू शकेल. त्याचप्रमाणे टीडीएस कापूनही तो न भरणाऱ्या कंपन्यांनाही लगाम बसणार आहे. किंगफिशरच्या काही कर्मचाऱ्यांना असा अनुभव आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता.