नवी दिल्ली : शीखविरोधी दंगलप्रकरणाचा हा निकालही अशा वेळी आला आहे, ज्यावेळी काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्यमंत्रीपदाची शपथ देतं आहे, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे.

1984 मधील शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शीख दंगलप्रकरणी आज हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अरुण जेटली म्हणाले की, या दंगलप्रकरणात शीख समाज काँग्रेसच्या ज्या दुसऱ्या एका नेत्याला दोषी मानते त्या नेत्याला काँग्रेस आज मुख्ममंत्रीपदाची शपथ देत आहे, असे ते म्हणाले.

शिक्षा सुनावण्यात आलेले सज्जन कुमार हे 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीचे प्रतिक आहेत. या प्रकरणात आता शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात आहे, असे जेटली म्हणाले.


जेटली म्हणाले, या प्रकरणी हायकोर्टाकडून आलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोर्टाची ही खूपच मोठी कामगिरी आहे. आमच्यापैकी अनेक जण या हत्याकांडाचे साक्षीदार होते. सर्वात भयंकर असे हे हत्याकांड होते. त्यावेळी काँग्रेस सरकारने दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले होते.

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्यासह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर 1984 मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. यांपैकी सज्जनकुमार यांना दिल्ली हायकोर्टाने आज दोषी मानत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शीख दंगली प्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेप
1984 मधील शीख दंगली प्रकरणी दिल्लीतील हायकोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या खटल्यात आज हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शीखविरोधी दंगल भडकली होती. दंगलीत 3 हजारपेक्षा अधिक शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेस नेत्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल भडकली, असा आरोप आहे.

सज्जन कुमार यांच्यावर दंगल भडकविल्याचा आरोप आहे. सज्जन कुमार हे तीन वेळा खासदार राहिलेले आहेत. सज्जन कुमार यांना 31 डिसेंबर 2018 पूर्वी शरण येण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

शीखविरोधी दंगलीप्रकरणी आता अखेर 34 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. षडयंत्र रचने, हिंसा घडवून आणणे आणि दंगली भडकवण्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे असून तब्बल 34 वर्षानंतर सज्जन कुमार यांना शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणात इतरही काही काँग्रेस नेत्यांवर आरोप आहेत. मध्य प्रदेशचे आगामी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरही या प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत.