समीर भोजवानीला पोलिसांनी एप्रिलमध्ये अटक केली होती. दिलीप कुमार यांचा वांद्र्यातल्या पाली हिल परिसरातील बंगला हडपण्यासाठी धमकी देण्यात येत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती. या बंगल्यातील काही जागेची खोटी कागदपत्रे तयार करून समीर भोजवानी ही जागा बळकाविण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार सायरा बानो यांनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या तक्रारीची दखल घेतली होती. त्यानंतर भोजवानी याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. भोजवानी सध्या तुरुंगातून बाहेर आला आहे. याचा दाखला देत सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरून मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
ट्विट करत मुंबईत भेटीसाठी विनंती
'मी सायरा बानो खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवू इच्छिते की, भूमाफिया समीर भोजवानी हा तुरुंगातून बाहेर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. पद्म पुरस्कार विजेत्याला धनाचा आणि बळाचा वापर करून धमकाविले जात आहे. आपल्याकडे मुंबईत भेटीसाठी विनंती करीत आहे', असे सायरा बानो यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.