नवी दिल्ली : एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Arun Goel Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये (Election Commission of India ) या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे.
अरुण गोयल यांची 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी भारत सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर लोकसभा निवडणुकीचा भार पडणार आहे.
कोण आहेत अरुण गोयल? (Who Is Arun Goel)
सध्या अरुण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत शिल्लक होता. मात्र तीन वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे. अरुण गोयल हे गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एका दिवसानंतर त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये अरुण गोयल यांची नियुक्ती कायद्यानुसार नसल्याचे म्हटलं होतं. हे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचेही उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. अरुण गोयल यांना मिळणाऱ्या कालावधीबद्दलही त्यामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली होती. असं असलं तरी एडीआरची ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती.