शिक्षकाने विद्यार्थिनींना भर वर्गात कपडे उतरवायला लावले
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2018 05:01 PM (IST)
विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी मापं घेत असल्याचे सांगून, शिक्षकाने भर वर्गात सर्व विद्यार्थिनींना कपडे उतरवायला लावले.
फोटो सौजन्य : ANI
कनौज/ उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या कनौजमधील जलालपूर कार्ती बांगेर गावातील एका सरकारी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी मापं घेत असल्याचे सांगून, शिक्षकाने भर वर्गात सर्व विद्यार्थिनींना कपडे उतरवायला लावले. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जलालपूर खत्री बांगेर गावातील सरकारी शाळेत सोमवारी नेहमीप्रमाणे सर्व वर्ग सुरु होते. याचवेळी इयत्ता आठवीत शिक्षणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षकाने बोलावले, आणि तिला कपडे उतरवायला सांगितले. नवीन गणवेशासाठी तिचं माप घेत असल्याचे सांगून शिक्षकाने तिला कपडे उतरवायला सांगितले. यानंतर विद्यार्थिनीने हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत, शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी वर्गातील इतरही विद्यार्थिनींची चौकशी केली. या चौकशीत त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे सर्वांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी खतौली कस्तूरबा निवासी विद्यालयातूनही असाच प्रकार समोर आला होता. विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या नावावर सर्व विद्यार्थिनींना कपडे उतरवायला लावले होते. या प्रकरणी तहसीलदारांच्या चौकशी अहवालानंतर विद्यालयाच्या नऊ शिक्षकांना निलंबित केलं होतं.