भाजपचं स्वप्न साकार, कलम 370 रद्द करण्याचे विधेयक लोकसभेतही मंजूर
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2019 08:21 PM (IST)
जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर आज लोकसभेतही मंजूर झाले आहे.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर आज लोकसभेतही मंजूर झाले आहे. विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत सर्व खासदारांनी मतदान केले. 351 विरुद्ध 72 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेत कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेत यावर जोरदार चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधक आणि काश्मीरातल्या फुटीरतावादी नेत्यांना खडे बोल सुनावले. शाह यांनी पाकिस्तानकडून जे लोक प्रेरणा घेतात त्यांच्याशी कसली चर्चा करणार? असा सवाल उपस्थित केला. तसेच काश्मीर खोऱ्यातील नागरिक आपले आहेत आणि त्यांच्याशी संवाद कायम राहील, अशा शब्दात शाहांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. तर काश्मीरमधील फोन, इंटरनेट सेवा ही केवळ खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी बंद केल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले. शाह म्हणाले की, कलम 370 हटवल्याने पाकव्याप्त काश्मीरवर आपला दावा अधिक मजबूत झाला आहे. या कलमामुळे फक्त तीन परिवारांचं भलं झालं आहे. शाह यांनी नाव न घेता अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरु परिवारांवर शरसंधान साधलं.