नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसाठी लागू असलेलं कलम 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल याबाबत म्हणाले की, मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करुन राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. तसेच काश्मीरी नेत्यांना तुरुंगात टाकणे ही बाब घटनाबाह्य आणि लोकशाहीविरोधी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


राहुल यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काश्मीरमधल्या प्रमुख नेत्यांना गुप्त ठिकाणी असलेल्या तुरुंगांमध्ये डांबण्यात आलं आहे. ही गोष्ट घटनाबाह्य आहे. कैद केलेल्या नेत्यांना लवकरात लवकर मुक्त करायला हवे.


त्याआधी केलेल्या एका ट्वीटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अटक करुन संविधानाचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्याला राष्ट्रीय एकीकरण म्हणता येणार नाही.

राहुल यांनी म्हटले आहे की, देश येथे राहणाऱ्या लोकांनी बनतो, जमीनीने नाही. केंद्र सरकार अशा प्रकारे त्यांच्याकडे असलेल्या शक्तीचा दुरुपयोग करुन आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी काल (05 ऑगस्ट) राज्यसभेत जाहीर केलं. तसंच त्यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीर राज्याची फेररचना विधेयक 2019 सादर केलं. यानुसार, जम्मू-काश्मीर राज्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आलं. हे विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर झालं आहे. मात्र काँग्रेसने केंद्र सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आणि राज्यसभेत प्रस्तावाच्याविरोधात मतदान केलं.