Ladakh Road Accident लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्करातील 7 जवान शहीद झाल्याची बातमी समोर येत आहे. तर इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाल्याचं समजतं आहे. अपघातावेळी वाहनात एकूण 26 जवान होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच गंभीर जखमी जवानांना भारतीय हवाई दलाच्या मदतीने उच्च केंद्रात पाठवण्यात आले. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, "जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ज्यात अधिक गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये नेणे समाविष्ट आहे." या अपघातात सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आज सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहीती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे.
परतापूर येथील शिबिरातून 26 जवान उपसेक्टर हनीफकडे जात असताना ही घटना घडली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास थोईसेपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन अचानक रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 50-60 फूट खोलीवर असलेल्या श्योक नदीत कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातात गाडीतील सर्व जण जखमी झाले आहेत.
सर्व 26 जणांना परतापूर येथील 403 फील्ड रुग्णालयात हलवण्यात आले असून लेहमधील सर्जिकल टीम परतापूरला पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात जवानांना मृत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर अनेक जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे. लष्कराचे वाहन कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरले आणि नदीत पडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, ''या अपघातावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लडाखमधील वाहन दुर्घटनेने मी दुखावलो आहे, ज्यात आपण आपल्या लष्कराच्या शूर जवान गमावले आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.''