नवी दिल्ली : भारतीय लष्कराने जवानांच्या मदतीसाठी खास व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. जेणे करुन जवान त्यांच्या समस्या सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा थेट लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधू शकतील.


सेना, वायुसेना आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या समस्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर लष्कराने हे पाऊल उचललं आहे. जवानांना आता 09643300008 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत.

लष्कराची अंतर्गत तक्रार निवारण व्यवस्था आहे. मात्र सगळीकडे तक्रार करुनही समाधान न झाल्यास जवान या नव्या सेवेमार्फत थेट लष्कर प्रमुखांशी संपर्क साधू शकतात, असं लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितलं. तक्रार करण्यासाठी फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज अशा कोणत्याही माध्यमातून जवानांना तक्रार करता येईल.

गेल्या काही दिवसांपासून जवानांकडून त्यांच्या तक्रारी सोशल मीडियावर मांडण्यात आल्या होत्या. सर्वात अगोदर बीएसएफ जवान तेज बहादूरने चांगलं जेवण दिलं जात नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीआरपीएफ जवान जीत सिंहने सुविधा मिळत नसल्याची तर सेनेच्या जवानाकडून अधिकारी घरगुती काम करुन घेत असल्याची तक्रार केली आली होती.