नवी दिल्ली : ‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.


काल (रविवार) मुज्जफरपूर इथं आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ‘संघ ही लष्करी संघटना नाही. पण देशाला गरज असेल तेव्हा सैनिकांच्या आधी आम्ही तयार होऊ.’ असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

स्वयंसेवकांनी चीनी सैन्याला रोखण्याचीही तयारी केली होती - भागवत

दरम्यान, याचवेळी मोहन भागवत यांनी आणखी एक दावा केला. 'संघाचे स्वयंसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी कायम तयार असून ते हसत- हसत बलिदान देऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीसाठी स्वयंसेवक नेहमी तयार असतात. जेव्हा चीन हल्ला करण्याच्या तयारीत होता त्यावेळी स्वयंसेवक सीमेवर लष्कर येईपर्यंत उभे होते. तेव्हा स्वयंसेवकांनी असंही ठरवलं होतं की, जर चीनी सैन्य आलंच तर त्यांना जोरदार प्रतिकार करायचा. त्यामुळे स्वयंसेवकांना जेव्हा जबाबदारी मिळते ती ते चोखपणे बजावतात.' असं भागवत यावेळी म्हणाले.

मोहन भागवत आणि भाजपवर ‘आप’ची टीका

दरम्यान, मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली आहे. आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवरुन या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'जर हे वक्तव्य दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नेत्याने दिलं असतं तर भाजपच्या लोकांनी त्याला आतापर्यंत पाकिस्तानात धाडलं असतं. मीडियाने तर फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता गोष्ट भागवतांची आहे.' असं ते म्हणाले.