गुवाहाटी : आसाममधील होजई जिल्ह्यात रेल्वेमार्ग पार करत असलेल्या हत्तींच्या कळपाला रेल्वेने धडक दिली. यामध्ये पाच हत्तींचा जागीच मृत्यू झाला आहे.


गुवाहाटी-सिलचर एक्स्प्रेसने हबैपूरमध्ये रेल्वेमार्ग ओलांडत असलेल्या हत्तींच्या कळपाला धडक दिली. यात पाच हत्तींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

उत्तर-पूर्व रेल्वे विभागाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात सांगितले, या दुर्घटनेत ट्रेनच्या इंजिनचं नुकसान झालं असून, या मार्गावरील रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ज्या ठिकाणी ही घटना घडली, ते क्षेत्र हत्तींसाठी राखीव वनक्षेत्र आहे. त्यामुळे या वनक्षेत्रात हत्तींचा कायम वावर असतो. या वनक्षेत्रातून रेल्वेचा वेग प्रती तास 20 किलोमीटर असा निश्चित करण्यात आला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कधी रेल्वेच्या धडकेत, कधी मानवी हल्ल्यात, तर कधी विष प्रयोग, अशांमुळे गेल्या वर्षभरात या वनक्षेत्रातील 70 हत्तींचा मृत्यू झाला आहे.