श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बहुतेक भागात पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार सुरु आहे. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
भारतात दिवाळीचा उत्सव सुरु असताना तिकडे सीमेवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरु आहेत.
जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सोडून संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरु आहे. कठुआ,सांबा आणि अखनूरमध्ये जोरदार फायरिंग सुरु आहे.
यावेळी पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार केला आहे.
पाक अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान उच्च आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याची चौकशी केली. मोहम्मद अख्तर असं या अधिकाऱ्याचं नाव असून, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं. मात्र त्याला भारत सोडून जाण्याची ताकीद दिली आहे.
भारतीय लष्कराचे गोपनीय दस्तावेज मोहम्मद अख्तरकडे सापडले असून, दिल्ली पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याचबरोबर पाक उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असणाऱ्या दोन हेरांना देखील क्राईम सेलने राजस्थानमधून अटक केली.
मौलाना रमझान आणि सुभाष जहांगीर हे दोघे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या एजंटसाठी काम करत होते आणि ते पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तालयाच्या देखील संपर्कात होते.