नवी दिल्ली: पाकिस्तानमधील भारतीय उच्च आयुक्तालयातील अधिकारी सूरजीत सिंह यांना 29 ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तान सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. भारतीय उच्चायुक्तला समन्स बजावून तसे आदेश देण्यात आले आहेत.
आज भारतानं हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरला पुढील 48 तासात भारत सोडून जाण्याची ताकीद दिली आहे.
भारतीय लष्कराचे गोपनीय दस्तावेज मोहम्मद अख्तर या अधिकाऱ्याकडे सापडले असून दिल्ली पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याचबरोबर पाक उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असणाऱ्या दोन हेरांना देखील क्राईम सेलने राजस्थानमधून अटक केली आहे. मौलाना रमझान आणि सुभाष जहांगीर हे दोघे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या एजंटसाठी काम करत होते आणि ते पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तालयाच्या देखील संपर्कात होते.