जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेने मृत्युशी झुंज देत एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शाजदा अहमद असं त्यांचं नाव असून त्या ३५ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारामुळे राइफलमॅन नजीर अहमद यांच्या पत्नी शाझदा यांनी सुरक्षित ठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला. पण अंदाधुंद गोळीबारात एक गोळी त्यांच्या कमरेच्या खालच्या भागाला लागली. शाजदा यांना तात्काळ सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.


गोळी काढण्यासोबतच 9 महिने पूर्ण होण्याआधीच त्यांची प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदा त्यांच्या शरीरातील गोळी काढण्यात आली त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. अखेर शाझदा यांनी एका 2.5 किलोग्रॅम वजनाच्या एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या शाजदा आणि त्यांच्या मुलीची प्रकृती चांगली आहे


या यशस्वी प्रसुतीनंतर शाजदा यांनी लष्कराचे आभार मानले आहेत. 'माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल लष्कराचे मनापासून आभार.'

दरम्यान, शस्त्रक्रिया करणाऱ्या लष्कराच्या डॉक्टरांनी सांगितलं की, 'ही सामान्य केस नव्हती. ही केस खूपच आव्हानात्मक होती. पण आमच्या टीमने ज्या पद्धतीने काम केलं ती खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. आई आणि मुलगी दोघीही पूर्णपणे स्वस्थ आहेत.'



मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला त्यावेळी शाजदा  आपल्या क्वॉर्टरमध्येच होती. दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली. त्यावेळी लष्कराच्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावत महिलेला वेळीच सैन्याच्या रुग्णालयात पोहचवलं.

10 फेब्रुवारीला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सुंजवाँ लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले. तर एका नागरिकाचाही यात मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांचाही खात्मा केला.

संबंधित बातम्या :

जम्मूतील सुंजवाँ कॅम्प ऑपरेशन संपलं, पाच जवान शहीद