नवी दिल्ली : सीमा ओलांडून भारतात आलात, तर जमिनीत गाडू, असा सज्जड दम लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दहशतवाद्यांना दिला आहे. शिवाय, गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशाराही रावत यांनी दिला.
"दहशतवादी तयार असले, तरी त्यांचा सामना करण्यासाठी आम्हीही इकडून तयार आहोत. आम्ही त्यांना अडीच फूट खोल जमिनीत गाडत राहू. शिवाय, सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून एक संदेश दिला होता. जर पुन्हा गरज भासली, तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करु.", असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला.
सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होण्याला दोन-तीन दिवस बाकी असताना लष्करप्रमुखांनी हा इशारा दिला आहे.
भारतीय लष्कराने यावर्षी आतापर्यंत जवळपास 150 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
उरी हल्ल्यानंतर 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले. उरी हल्ल्याच्या उत्तरादाखल 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताने सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसीवर दहशतवाद्यांच्या सात ठिकाणांवर हल्ला करुन उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनमध्ये 30 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.