नवी दिल्ली: जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी आज 9 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटनांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोर लावला होता. दरवर्षीप्रमाणे लिंगदोह समितीच्या सूचनांना धाब्यावर बसवत पैशांचा सर्रास वापर करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाच्या निवडणूक आयोगाने आता सर्व उमेदवारांना नोटीस पाठवली असून यामध्ये एनएसयूआय आणि अभाविपच्या उमेदवारांचाही समावेश आहे.


 

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध संघटनांनी वेगळीच युक्ती लढवल्या गेल्या. आचारसंहिता लागू असतानाही प्रचारासाठी प्रियंका चोप्रा आणि अर्जुन कपूरचे पोस्टर्स विविध कॉलेज बाहेर लावण्यात आले होते.

 

प्रियंका चोप्राने 7 सप्टेंबर रोजी अॅमी अवॉर्डचे सूत्र संचालन केल्याबद्दल शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्याच पोस्टरवर एके ठिकाणी 4 नंबरचं स्टिकर लावण्यात आले होतं. वास्तविक, हा क्रमांक अभाविपकडून उपाध्यक्षपदाची उमेदवार प्रियंका चावडीचा बॅलेट नंबर होता. हे पोस्टर्स विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये लावण्यात आले होते.

 

अभाविपच्या या प्रकाराला एनएसयूआयनेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी दौलत राम कॉलेज आणि इतर कॉलेजजवळ अर्जुन कपूरचं पोस्टर लावलं. या पोस्टरवर अर्जुन कपूरच्या फोटो शेजारी 2 नंबर लिहला होता. हा नंबर एनएसयूआयकडून उपाध्यक्ष पदाचा उमेदवार अर्जुन चपरानाचा बॅलेट नंबर आहे.



 

यानंतर अभाविपने एक पाऊल पुढे टाकत जेएनयूतील विद्यार्थ्यांना मोफत चहा वाटप केले. यासाठी अभाविपने वापरलेल्या ग्लासच्या माध्यमातूनही निवडणूक प्रचार करण्यात आले. त्या ग्लासवर उमेदवारांची नावे छापली होती.