चंदीगढ: पंजाबमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी 'आवाज ए पंजाब' या नव्या पक्षाची घोषणा केली. पंजाबला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या ध्येयातून ही नवी सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक पक्षात चांगल्या लोकांचा केवळ सजावटीसाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत भाजपला टोला हणला.
सिद्धू यांनी यावेळी पक्षाची घोषणा करताना, पंजाब, पंजाबियत आणि पंजाबीचा नारा दिला. तसेच त्यांनी सत्ताधारी अकाली दल-भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यासह आम आदमी पक्षावरही टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री बादल आणि अमरिंदर सिंह यांना लक्ष्य करून, हे दोघेही एकाच थाळीत जेवत असल्याचा आरोप केला. तसेच या दोघांचीही अंतर्गत युती असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सिद्धू यांनी भाजपवरही निशाणा साधताना 2014च्या लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून अमृतसर मतदार संघ मुद्दाम षडयंत्र रचून काढून घेतल्याचे सांगितले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने अकाली दलाचा प्रचार करण्यास सांगितल्याने आपण राजीनामा दिल्याचे सांगितलं.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सिद्धु यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले की, केजरीवालांना त्यांची हंजी हंजी करणारे कार्यकर्ते हवे आहेत. त्यामुळे त्यांनी मला निवडणुक न लढवण्याची अट घातली होती.