नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी अपूर्वा शेखरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर शुक्रवारी (19 एप्रिल) दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर तिवारींचा मृत्यू गुदमरुन झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिस सातत्याने अपूर्वा शेखरसह घरातील सहा जणांची चौकशी करत होते. चौकशीनंतर अपूर्वाला अटक करण्यात आली.

रोहित शेखर दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये राहत होता. नऊ दिवसांपूर्वी रोहित शेखर तिवारीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आई आणि पत्नी 16 एप्रिल रोजी रोहितला संध्याकाळी दिल्लीच्या साकेत मॅक्स रुग्णालयात मृतावस्थेत घेऊन आले होते.

...आणि पोलिसांचा अपूर्वावरील संशय वाढला!

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित शेखरच्या हत्येमध्ये अपूर्वाचा सहभाग होता. दिल्ली क्राईम ब्रान्चच्या चौकशीत अपूर्वाने सत्य कथन केलं. सातत्याने बदलणाऱ्या अपूर्वाच्या जबाबामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय अधिक वाढला.

रोहित शेखरच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने घटनाक्रम समोर आला, त्यानंतर अपूर्वाला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. हत्या झालेल्या रात्री अपूर्वा आणि रोहित यांच्यात वाद झाल्याचं चौकशीत समोर आलं. त्या रात्री रोहित त्याच्या मैत्रिणीसोबत दारु पीत असल्याचं अपूर्वाने पाहिलं होतं, त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं होतं. तसंच माहेरच्यांसाठी वेगळं घर बनवण्यावरुन अपूर्वा आणि रोहितमध्ये वाद झाला होता.

हत्येच्या रात्री दोघांमध्ये झटापट झाली आणि यावेळी अपूर्वाने रोहितचा गळा दाबून त्याची हत्या केली. पोलिसांनी अपूर्वाच्या रक्ताचे नमुने आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या डागांचे नमुने घेतले होते.

पुरावे नष्ट करण्यासाठी अपूर्वाने तिचा मोबाईल फोनही फॉरमॅट केला. ज्या खोलीत रोहितची हत्या झाली, तिथला सीसीटीव्ही कॅमेरा खराब असणं यामुळेही संशय वाढला होता. अपूर्वा आतापर्यंत तीन वेळा जबाब बदलल्याने पोलिसांचा संशय आणखीच वाढला.

रोहित शेखरचा मृत्यू अनैसर्गिक : शवविच्छेदन अहवाल

रोहित शेखर तिवारी 15 एप्रिल रोजी बाहेरुन घरी परतला. घरातील नोकरांचा जबाब आणि सीसीटीव्ही फूटेजवरुन रोहित मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्याचं स्पष्ट झालं आहे. घरी परतताच ते आपल्या खोलीत जाऊन झोपला. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास रोहित शेखर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. दरम्यानच्या काळात रोहित यांना कुणीही उठवण्याचा प्रयत्न केला नाही.

VIDEO | एन.डी.तिवारी यांचे पुत्र रोहितच्या हत्येप्रकरणी कुटुंबावरच संशयाची सुई


रोहित शेखर यांच्या हृदयाची क्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र रोहित शेखरच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं निष्पन्न झालं. रोहित शेखर तिवारीचा मृत्यू गुदमरुन झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

कोर्टात खटला, 6 वर्षांनी अधिकार मिळाला

मागील वर्षी 18 ऑक्टोबर 2018 रोजी एनडी तिवारी यांचं निधन झालं होतं. 2008 मध्ये रोहित शेखरने कोर्टात खटला दाखल करुन एनडी तिवारीच आपले बायोलॉजिकल वडील असल्याचा दावा केला होता. यानंतर 2011 मध्ये तिवारी यांना डीएनए तपासणीसाठी रक्त द्यावं लागलं होतं. रक्त तपासणीचा अहवाल सार्वजनिक न करण्याची विनंती एनडी तिवारींनी कोर्टात केली होती. परंतु कोर्टाने ही विनंती फेटाळली.

अखेर डीएनए रिपोर्टमध्ये एनडी तिवारीच रोहित शेखरचे बायोलॉजिकल वडील असल्याचं समोर आलं. मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचं मान्य केलं होतं. यानंतर तिवारी यांनी 2014 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी लग्न केलं. कोर्टातील वाद संपल्यानंतर रोहित वडिलांसोबतच राहत होता.

रोहित शेखर 2017 मध्ये भाजपमध्ये सामील झाला होता. एक वर्षापूर्वी त्याने अपूर्वा शुक्लासोबत लग्न केलं होतं. मूळची इंदूरची असलेली अपूर्वा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करते. रोहितच्या साखरपुड्याच्या वेळी एनडी तिवारी यांच्यावर मॅक्स रुग्णालयातच उपचार सुरु होते.