नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या लढ्यात लस हे प्रमुख हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लसीकरण वेगाने करण्याची गरज आहे. मात्र देशातील लसीची उपलब्धता आणि नागरिकांची संख्या यांच्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मात्र रशियाची लस 'स्पुटनिक व्ही' ही येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना उपलब्ध होणार आहे. अपोलो रुग्णालयाने गुरुवारी ही माहिती दिली आहे.
अपोलो रुग्णालयाचे कार्यकारी उपाध्यक्ष शोभना कामिनी यांनी सांगितले की, भारत सरकारने ज्या तिसऱ्या लसीच्या परवानगी दिली आहे ती स्पुटनिक व्ही लस जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना दिली जाणार आहे. देशभरातील अपोलो रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध होईल.
या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात स्पुटनिकचे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली होती. देशात स्पुटनिक व्हीचे उत्पादन आता सुरु होणार असून रशियाच्या आरडीआयएफच्या सहकार्याने पॅनासिया बायोटेक भारतात स्पुतनिक व्हीची निर्मिती करणार आहेत. भारतातील पॅनेसिया बायोटेक आता दर वर्षी स्पुटनिक व्ही लसीचे 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी डोस तयार करेल, असं स्पुटनिक कंपनीनं सांगितलं आहे.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुतनिकच्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. जून महिन्यात वाढवून 50 लाखापर्यंत पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. देशात यावर्षी स्पुटनिक-व्हीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील, असं डीबी वेंकटेश वर्मा यांनी सांगितलं
भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली गेली आहे. याची किंमत 948 रुपये असेल यावर पाच टक्के जीएसटी लागल्यानंतर त्याच्या एका डोसची किंमत 995 रुपये असेल. रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून 13 मे 2021 रोजी ही लस मंजूर झाली होती.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन Sputnik V लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आता या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे.