बेळगाव : कोरोना संक्रमण वाढत असल्याने शहरात सध्या रुग्णवाहिकांची वर्दळ लॉक डाऊन असताना पाहायला मिळते. अशा परिस्थितीत एका माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतल्यानं अर्धा तास खोळंबा झाला. बेळगावातील के एल ई हॉस्पिटलच्या आवारात ही घटना घडली. रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर चावी तशीच सोडून खाली उतरला होता. तेवढ्यात एका माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतली.रुग्णवाहिकेची चावी घेवून ते माकड रुग्णवाहिकेच्या टॉप वर चढून चावी बरोबर खेळ करत बसले होते.


ड्रायव्हर रुग्णवाहिका नेण्यासाठी आल्यावर त्याला माकडाने चावी काढून घेतल्याचे ध्यानात आले.त्याने जवळजवळ अर्धा तास माकडाकडून चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला पण ते माकड चावी देण्यास तयार नव्हते.शेवटी कुणीतरी केळी आणून ड्रायव्हरला दिली. ती केळी माकडाला दिल्यावर माकडाने चावी सोडून केळीवर ताव मारला. तेवढ्यात ड्रायव्हरने माकडाजवळ असलेली चावी काढून घेतली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ चाललेल्या मर्कट लीलामुळे तेथील उपस्थितांची मात्र करमणूक झाली.


रुग्णवाहिका ड्रायव्हरचा हलगर्जीपणा


बेळगावात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच अन्य आजारांसाठी देखील रुग्णवाहिकेची मागणी वाढली आहे. अशा वेळी ड्रायव्हरने रुग्णवाहिकेची चावी तशीच सोडण्याचा हलगर्जीपणा केला. रुग्णवाहिका आहे पण ड्रायव्हर नाही अशी परिस्थिती कालच उद्भवली होती. त्यावेळी एका पत्रकाराने बेळगाव ते सावंत वाडी रुग्णवाहिका ड्राईव्ह करून गर्भवती महिलेला सावंतवाडीला पोहोचवले होते.त्यामुळे सद्य परिस्थितीत सगळ्यांनीच अधिक सजग राहावे असा संदेश माकडाने मर्कट लीला करून दिला आहे.