नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबद्दल (Corona vaccination) अनेकांना अनेक प्रश्न आहेत. कोरोनाची (Coronavirus) कोणती लस जास्त प्रभावी आहे? दोन लसीमधलं अंतर किती असावं? लस घेतल्याने त्रास होणार नाही ना? तसेच दोन वेगळ्या लसींचे डोस घेतले तर काही दुष्परिणाम तर होणार नाही ना असाही प्रश्न अनेकांना आहे. कारण एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे डोस दिल्याचे अनेक प्रकरणे समोर आल्याने हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान केंद्र सरकारने दोन वेगवेगळे डोस घेतल्यास चिता करण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) घेतलेल्या पत्रकार परिषदेत निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं की, लसीकरणाच्या प्रोटोकॉलनुसार एकाच लशीचे दोन डोस द्यायला हवेत. जर एखाद्या प्रकरणात एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कोरोना लसीचे डोस दिले गेले तरी फार चिंतेचं कारण नाही, ते देखील सुरक्षित आहे. केंद्र सरकार मिक्स अँड मॅच कोरोना लशीच्या ट्रायलबाबतही विचार करत आहे.