विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे एका फार्मा कंपनीतून झालेल्या वायू गळतीमुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. विशाखापट्टणममध्ये घडलेल्या ##VizagGasLeak प्रकरणावर आता अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केले आहे. दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांच्यासह दक्षिणेतील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या दुःखद दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेची बातमी समजल्यानंतर चिरंजीवी यांनी ट्विटरवर लिहिले की, “लॉकडाऊननंतर कारखाने उघडण्यास परवानगी देण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.
दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी ट्विट केले की, "विझाग गॅस गळती घटनेची जी छायाचित्रं समोर आली, ती अत्यंत दुःखद आहेत. जे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी मी मी प्रार्थना करतो. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो'
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरने यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं.
सुपरस्टार महेश बाबू यांनीही याबाबत ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, “विझाग गॅस गळतीची घटना हृदय हेलवणारी आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत, अशी घटना घडल्याने परिस्थिती आणखी वाईट झाली आहे.
अभिनेत्री तमन्नाह भाटियानेही याबद्दल दुःख व्यक्त केले. विझाग गॅस गळतीची घटना अत्यंत वेदनादायी आहे. यात जीव गेलेल्या लोकांना मी श्रद्धाजली वाहते. तर, जे जखमी आहेत, अशांसाठी प्राथर्ना करत असल्याचे तमन्नाने लिहलं आहे.
काय आहे घटना? आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे एका फार्मा कंपनीतून वायू गळती झाली. आज (7 मे) सकाळी ही घटना घडली. विशाखापट्टणमच्या आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर कंपनीतून वायू गळती झाली. यामुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वायू गळतीमुळे गावासह संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने आजूबाजूची पाच गावं रिकामी केली आहेत. एलजी पॉलिमर कंपनीच्या तीन किमी परिसरात वायू गळतीचा परिणाम दिसत आहे.
Visakhapatnam gas leak | विशाखापट्टणममध्ये वायू गळती, बालकासह आठ जणांचा मृत्यू