नवी दिल्ली : लवकरच भारतीय रेल्वेमध्ये चार लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी जाहीर केले. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या नोकरभरतीला मोदी सरकारचा नवा जुमला म्हटले आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, "पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला रिक्तपदे भरण्याची अचानक आता जाग आली आहे."

चिदंबरम यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले आहे की, ''रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2 लाख 82 हजार 976 पदं रिक्त आहेत. रिक्त पदं भरण्याची सरकारला अचानक जाग आली आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हा आणखी एक जुमला आहे.

चिदंबरम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ''रेल्वेसह अन्य सरकारी विभागांमध्ये अशी परिस्थिती आहे. देशात विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत आणि दुसऱ्या बाजुला देशातील बहुसंख्य तरुणवर्ग बेरोजगार आहे."

दरम्यान, भारतीय रेल्वेत एक लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. येत्या दोन वर्षात एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. असे मिळून दोन लाख 32 हजार रिक्त जागा तसेच क व ड श्रेणीतील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व मिळून येत्या दोन वर्षात जवळपास रेल्वेत चार लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी बुधवारी दिली.