लाहोरपर्यंत धडक मारुन पाकला नेस्तनाबूत करण्याची गरज: अण्णा हजारे
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2016 11:43 AM (IST)
अहमदनगर: जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा देशभरात निषेध करण्यात येतो आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज व्यक्त केली आहे. सरकार अजून किती दिवस जवानांवरील हल्ले सहन करणार? असा सवाल अण्णांनी केला आहे. आता लाहोरपर्यंत धडक मारुन पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली आहे. 'माझं वय झालं असलं तरी मी मनानं तरुण आहे. वेळप्रसंगी या वयातही सीमेवर जाण्यास तयार आहे.' असं अण्णा म्हणाले. 'सैनिक ऊन, वारा पावसात देशाचं रक्षण करतात, मात्र पाकिस्तान दहशतवाद्यांना पुढं करुन हल्ले करतो. त्यामुळं सरकार, जनता आणि दहशतवादविरोधी देशांनी एकत्र येऊन पाकिस्तानमधील दहशतवाद मुळासह उखडून टाकता येईलं.' असंही अण्णा म्हणाले. तसंच युद्ध जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते राळेगणमध्ये बोलत होते.