नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर सैन्यदलाची रणनीती आखण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात वॉर रुममध्ये एक विशेष बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 2 तास चाललेल्या या गुप्त बैठकीमध्ये भारताच्या तिन्ही दलाच्या लष्कर प्रमुखांनी पाकव्याप्त काश्मीरमधल्या संभाव्य कारवाईची रणनीती स्पष्ट केली.


20 सप्टेंबरच्या रात्री पंतप्रधान कार्यालयातील वॉर रुममध्ये नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग, हवाईदलाचे प्रमुख अरुप राहा आणि नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा उपस्थित होते.

या बैठकीत नरेंद्र मोदी यांना अत्यंत गोपनीय माहिती देण्यात आली. इतकंच नाही, तर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांची माहितीही देण्यात आली. पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, काश्मीरचे नकाशे आणि दहशतवादी तळांचे मॉडेल्सही या बैठकीत तयार करण्यात आले.

पंतप्रधान मोदींची वॉर रुममधील ही तिसरी बैठक होती. याआधी त्यांनी दोन वेळा वॉर रुममध्ये सैन्य आणि सुरक्षेसंदर्भात अनेक माहिती घेतली आहे. मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती वेगळी आहे. पंतप्रधान यावेळी पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधानांनी तिन्ही दलाकडून युद्धाच्या परिस्थितीचा प्लॅन मागितला आहे. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना खात्मा करण्यासाठी भारत तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.