नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचं रणशिंग फुंकणाऱ्या अण्णा हजारेंच्या निशाण्यावर आता राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हंही आहेत. “निवडणूक लढताना पक्षांना राजकीय चिन्हांची गरज नाही, पक्षाच्या नावावर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येत असल्याने ही चिन्हंच गायब करा,” अशी एक नवीच मागणी अण्णांनी केली आहे.


निवडणूक आयोगाला आपण यासाठी अनेकदा पत्रं लिहिली असून भविष्यात कोर्टाची दारंही ठोठावू, असा इशारा अण्णांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिला आहे.

“घटनेच्या कलम 84 मध्ये निवडणुकीसंदर्भातले नियम दिले आहेत, त्यात कुठेही चिन्हाचा उल्लेख नाही. त्यामुळे चिन्हांची ही पद्धतच घटनाबाह्य असल्याचा अण्णांचा दावा आहे. चिन्हांच्या नावाखाली लोकांचे समूह निर्माण झाले, त्यातूनच भ्रष्टाचार-गुंडगिरी वाढली,” असा तर्कही त्यांनी लढवला आहे.

“आज राजकीय पक्षांसाठी चिन्ह ही ओळख बनलेली असताना चिन्हंच गायब झाली तर या निवडणूक व्यवस्थेत अनागोंदी येणार नाही का असा प्रश्न विचारल्यावर, काहीही अनागोंदी होणार नाही, उलट देश चांगलाच चालेल. कारण त्यामुळे पक्ष ही व्यवस्थाच राहणार नाही असं उत्तर अण्णांनी दिलं. ही लढाई प्रदीर्घ असून त्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल,” असंही अण्णांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अण्णा लवकरच कोर्टातही याचिका दाखल करायच्या तयारीत आहेत.

दरम्यान अण्णा नव्या आंदोलनाच्या तयारीत असताना त्यांनी या मुलाखतीत महाराष्ट्र सरकार, मोदी, फडणवीस, संघाशी संबंध या बऱ्याच विषयांवर पहिल्यांदाच थेट उत्तरं दिली आहेत.

महाराष्ट्रात भाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची एवढी उदाहरणं आली, त्यावर अण्णांनी तोंड का उघडलं नाही? अस प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “भ्रष्टाचारविरोधी लढाई लढताना समोर कुठला पक्ष आहे हे कधी पाहिलं नाही. महाराष्ट्रात गेल्या काही काळात अनेक मंत्र्यांची नावं समोर आली हे खरंय. पण कुणीही मला अजून पुरावे दिले नाहीत.”

शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात संप केला, या सरकारमध्ये शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे का? असं विचारलं असता अण्णांचं उत्तर होतं की, “हे सरकार शेतकरी या विषयावर काही बोलायलाच तयार नाही. त्यांना उद्योगपतींबद्दल बोलायला वेळ आहे. सरकार उत्पन्न दुप्पट करायचं म्हणतंय, पण कृती तर अजिबात दिसत नाही.”

मोदींबद्दल अण्णांना काय वाटतं?
“मोदी सरकारला तीन वर्षे दिली. तीन वर्षे स्तब्ध राहिलो, पण सरकारने काही ठोस केलेलं नाही,” असं अण्णा हजारे म्हणाले.

अण्णांच्या आंदोलनाने काँग्रेसचं सरकार गेलं, अण्णांच्या आंदोलनामागे संघ असतो अशी चर्चा असते त्यावर ते म्हणाले की, “आजपर्यंत मी जी आंदोलनं केली आहेत, ती सगळ्या पक्षांच्या विरोधातली आहेत. एक आंदोलनं एखाद्या विरोधात केलं की विरोधी माझ्या इर्द गर्द फिरत असतात हे नक्की. त्यामुळे काहींना तसं वाटत असावं.”