मुंबई: अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी नोटबंदीबाबत पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. 'नोटबंदीसाठी आम्ही जसा प्रस्ताव दिला होता. त्याप्रमाणे तो सरकारनं लागू केला नाही.' असं म्हणत बोकील यांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त 'मुंबई मिरर'नं दिलं आहे.

सरकारनं नोटबंदीचा प्रस्ताव तर मान्य केला पण तो अर्धवट मान्य केला. त्यामुळे अनिल बोकील पंतप्रधान मोदींची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत.

अनिल बोकील यांनी जुलैमध्ये मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी त्यांनी पाच प्रमुख मुद्दे त्यांच्यासमोर मांडले होते. ज्यामधील सरकारनं केवळ दोनच गोष्टी लागू केल्या. त्यामुळेच जनतेला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. असं बोकील यांचं म्हणणं आहे.

अनिल बोकिलांनी दावा केला आहे की, त्यांच्या संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या रोडमॅपनुसार अंमलबजावणी झाली असती तर लोकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. सरकारनं नोटबंदीसोबत केंद्र आणि राज्यात लागू असलेली करप्रणाली बंद करणं गरजेचं होतं. पण तसं न करता फक्त नोटबंदीचा निर्णय लागू करण्यात आला.

नोटाबंदीसाठी अनिल बोकीलांनी मांडले होते हे पाच मुद्दे:

1. आयकरासहित एकूण ५६ प्रकारचे कर रद्द करावे. फक्त  आयात कर कायम ठेवण्यात यावा.

2. रोख पैशांच्या व्यवहारावर मर्यादा घालण्यात यावी.

3. चलनात असलेल्या मोठ्या नोट्या म्हणजेच 1000, 500 आणि 100च्या नोटा चलनातून रद्द कराव्यात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडेल.

4. सर्व आर्थिक व्यवहार एका मर्यादे पलीकडे बँकेमार्फत करण्याची सक्ती करावी.

5. बँक ट्रॅन्जॅक्शन टॅक्स हा एकच कर असावा. तो कर जास्तीत जास्त २ टक्के आणि कमीतकमी ०.७ टक्के असावा.

VIDEO: