Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. या भीषण रेल्वे अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 100 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. एएनआयच्या एजन्सीच्या वृत्तानुसार, विझियानगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी ट्रेन दुसऱ्या ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला. अलमांडा आणि कंटकपल्ले सेक्शन हा अपघात घडला.
आंध्र प्रदेशात मोठा रेल्वे अपघात
विजियानगरमचे एसपी दीपिका यांनी एएनआयला माहिती देताना सांगितलं की, या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 18 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखाहून रायगडाकडे जाणाऱ्या रेल्वेचे डबे कोठावलसा अलमंडा-कंटकपल्ली येथे रुळावरून घसरले. अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले असून मदत आणि बचावकार्य राबवण्यात येत आहे.
दोन ट्रेनची टक्कर होऊन 14 जणांचा मृत्यू, 100 जण जखमी
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले आहे. जखमीवर योग्य उपचार व्हावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य, पोलीस आणि महसूलसह इतर सरकारी विभागांना जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. PMNRF कडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे मंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याशी संवाद साधला. त्यांना आंध्र प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातासंदर्भात माहिती घेतली