Kandukur Stampede News: आंध्र प्रदेशमध्ये  माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नाडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंद्रबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये झालेली घटना स्पष्ट दिसत आहे.


नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरमध्ये बुधवार (28 डिसेंबर) टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा रोड शो होता. चंद्रबाबू नायडू यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक असे हजारो लोक सहभागी झाले होते. त्यावेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. चंद्रबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केलेय. चेंगराचेंगरीची घटना झाल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी रोड शो अर्ध्यावर सोडून जखमींच्या भेटीसाठी रुग्णालय गाठलं. त्याशिवाय मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. 






7 जणांचा मृत्यू - 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रबाबू नायडू यांच्या कंदुकुर येथील रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हणामारी झाली. त्यावेळी तिथे चंगराचेंगरी झाली. यामध्ये सात टीडीपी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रबाबू नायडू यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.  




भाजप नेत्यानं व्यक्त केलं दु:ख
आंध्र प्रदेशचे भाजप नेते विष्णु वर्धन रेड्डी यांनी या घटनेनंतर ट्वीट करत दु:ख व्यक्त केलेय. ते म्हणाले की, "कंदुकुर, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. राज्य सरकारनं या सर्वांसाठी तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करावी. मृत्यू आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांति."