हैदराबाद: आंध्र प्रदेशातील विजयवाड्याजवळ खासगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 20 प्रवासी जखमी आहेत.
चालकाचा डोळा लागल्यामुळे, कॅनलवरील दोन ब्रिजच्या मधून ही बस खाली कोसळली.
ओदिशातील भुवनेश्वरहून हैदराबादकडे निघालेली ही बस, पहाटे साडेपाचच्या सुमारास हैदराबादजवळच्या कृष्णा जिल्ह्यात अपघातग्रस्त झाली.
दीवाकर ट्रॅव्हल्सच्या या बसमध्ये 38 प्रवासी होते. ओदिशावरुन निघालेल्या या बसने 1 हजार किमी अंतर पार केलं होतं. विशाखापट्टणजवळ थांबा घेऊन ही बस पुढे निघाली होती. त्यावेळी गाडीचा चालकही बदलला. मात्र पहाटेच्या सुमारास डोळ्यावर झोप आल्याने, ही भीषण दुर्घटना घडली.
मुलपड्डू गावाजवळ एका कॅनवरील ब्रिजवर बस गेली, मात्र चालकाचा ताबा सुटल्यामुळे, त्या ब्रिजच्या मधल्या फटीतून बस थेट खाली कोसळली.
या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
या ट्रॅव्हल्समधील बहुतेक प्रवासी हे विशाखापट्टणम, भुवनेश्वर आणि हैदराबादेतील होते.
दीवाकर ट्रॅव्हल्सचा दुसरा मोठा अपघात
दीवाकर ट्रॅव्हल्स ही तेलगु देसम पक्षाचे खासदार जे सी दीवाकर रेड्डी यांची आहे. दीवाकर ट्रॅव्हलसचा हा दुसरा सर्वात मोठा अपघात आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2013 मध्ये दीवाकर ट्रॅव्हल्सच्या बंगळुरु-हैदराबादला भीषण अपघात झाला होता. चालत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याने त्यावेळी 45 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.