Teen Athlete Raped Multiple Times : केरळमधील एका 18 वर्षीय ॲथलीटने गेल्या दोन वर्षांत 60 लोकांनी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एक एनजीओ नियमित फील्ड भेटीदरम्यान मुलीच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली. यानंतर बाल कल्याण समितीने (CWC) पथनामथिट्टा पोलिसांकडे तक्रार केली. 


वर्गमित्र, सहकारी अॅथलीट आणि कोचकडून अत्याचार 


पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवताना सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शुक्रवारी सहा जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दोन पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. वयाच्या 16व्या वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. वर्गमित्र, सहकारी अॅथलीट आणि कोचकडून पीडितेवर अत्याचार झाल्याचे पुरावे सापडल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बाल कल्याण समितीने मुलीचे मानसशास्त्रज्ञाकडून समुपदेशनही केले. यादरम्यान तिने सांगितले की, जेव्हा ती 13 वर्षांची होती, तेव्हा तिच्या एका शेजाऱ्याने पहिल्यांदा तिच्यासोबत पोर्न मटेरिअल शेअर केले होते. आता ती 18 वर्षांची आहे.


प्रशिक्षणादरम्यानही लैंगिक अत्याचार झाले


मुलीने समुपदेशनादरम्यान सांगितले की, ती शाळेच्या काळात क्रीडा उपक्रमात भाग घेत असे. प्रशिक्षणादरम्यान तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचारही झाले. त्याचे काही व्हिडिओही प्रसारित झाले होते. त्यामुळे मनोधैर्य खचले. पीडित मुलीचा सविस्तर जबाब  नोंदवले जाणार असल्याचे पथनमथिट्टा पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे. मुलीकडे स्वतःचा मोबाईल नाही. ती तिच्या वडिलांचा फोन वापरते. वडिलांच्या फोनमध्ये आरोपींचे नंबर सेव्ह केले होते.


CWC म्हणाले, मुलीची काळजी घेणार 


CWC चे जिल्हाध्यक्ष पथनमथिट्टा एन राजीव यांनी सांगितले की, मुलगी आठवीत शिकत असताना सुमारे 5 वर्षांपासून तिच्यावर अत्याचार होत होते. ती क्रीडा क्षेत्रात सक्रिय होती. सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. आता CWC काळजी घेईल.


महिलांवरील गुन्ह्यांमध्ये उत्तर आणि मध्य भारतातील राज्ये आघाडीवर 


NCRB च्या अहवालात असे दिसून आले आहे की महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण (प्रति 1 लाख लोकसंख्येमागे घटनांची संख्या) 2021 मध्ये 64.5 टक्क्यांवरून 2022 मध्ये 66 टक्क्यंपर्यंत वाढली आहे. त्यापैकी 2022 मध्ये 19 महानगरांमध्ये एकूण 48 हजार 755 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली, जी 2021 च्या तुलनेत 12.3 टक्के अधिक आहे (43 हजार 414 प्रकरणे). 2022 मध्ये 65 हजार 743 गुन्ह्यांसह उत्तर प्रदेश महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (45331 प्रकरणे) आणि राजस्थान (45058 प्रकरणे), पश्चिम बंगाल (34738 प्रकरणे) आणि मध्य प्रदेश (32765 प्रकरणे) यांचा क्रमांक लागतो.


इतर महत्वाच्या बातम्या