अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमध्ये दसऱ्याला भीषण अपघात झाला. अमृतसरच्या जोडा फाटक परिसरात रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. हे लोक ट्रॅकवर रावण दहन पाहत असताना तिथे डीएमयू ट्रेन त्यांच्यासाठी काळ बनून आली. अवघ्या पाच सेकंदात चहुकडे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अपघातातील मृतांची संख्या वाढून 61 झाली आहे तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

पोलीस आयुक्तांनी मृत आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे. रेल्वे अपघातातील जखमींना तरणतारण, जालंधर, गुरदासपूर आणि अमृतसरमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या दुर्दैवी अपघातानंतर पंजाब सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

कसा झाला अपघात?
जोडा फाटक परिसरात रावण दहन आणि फटाके फुटल्यानंतर गर्दीपैकी काही लोक रेल्वे रुळावर आले. रुळावर आधीपासूनच मोठ्या संख्येने लोक रावण दहन पाहत होते. संध्याकाळी सातच्या सुमार जोडा फाटकवरुन डीएमयू ट्रेन आली. ही डीएमयू ट्रेन जालंधरहून अमृतसरला जात होती. ही भरधाव ट्रेन रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवत निघून गेली. रावण दहनाच्या वेळी फटाक्याच्या आवाजामुळे ट्रेन आल्याचं समजलं नाही आणि हा दुर्दैवी अपघात झाला.

नवज्योत कौर यांच्यावरही सवाल
रावण दहनच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघातासाठी काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून नवज्योत कौर सिंह उपस्थित होत्या. अपघातावेळी त्या तिथेच हजर असल्याचा दावा केला जात आहे. ज्या कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रशासनाने परवानगी दिली नाही, त्यात नवज्योत कौर सिद्धू का उपस्थित होत्या असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र नवज्योत कौर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अपघातानंतर मी तातडीने रुग्णालयात पोहोचले आणि जखमींची विचारपूस केली, असा दावा त्यांनी केला.



कोणी राजकारण करु नये : नवज्योत सिंह सिद्धू
तर दुसरीकडे अमृतसर पश्चिमेचे आमदार नवज्योत सिंह सिद्धू रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. "अपघातावर राजकारण करु नये असं त्यांनी म्हटलं आहे. हा अपघात आहे. दुख:द आहे, जो सहन करता येणार नाही. राजकीय पोळी भाजण्याचा ही वेळ नाही. कोणाकडे बोट दाखवण्याचं प्रकरण नाही. कोणी जाणूनबुजून हे केलं नाही," असं नवज्योत सिंह सिद्धू म्हणाले.

प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?
प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनावर प्रंचड संताप व्यक्त केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची वेळ ही सायंकाळी सहा वाजताची होती. पण कार्यक्रमासाठी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी येणार होत्या. त्या जवळपास साडे सात वाजता आल्या आणि ही ट्रेनची वेळ होती. विशेष म्हणजे ही घटना घडताच सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे लोक नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.

प्रत्यक्षदर्शींचा दुसरा आक्षेप म्हणजे, ट्रेन येण्यापूर्वी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. कार्यक्रमाच्या वेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालू होती, ज्यामुळे ट्रेनचा हॉर्न ऐकायला आला नाही. पण प्रशासनाने पूर्वसूचना देणं गरजेचं होतं, अशं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

अपघातावर कोण काय म्हणालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असल्याचं मोदींनी म्हटलंय.


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या अपघाताच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. ते स्वतः उद्या अमृतसरला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही रेल्वे अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. "अपघातामुळे धक्का बसला. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांचं सांत्वन आहे. राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी मदत आणि बचाव कार्यात सहभागी व्हावं आणि जखमींना हरतऱ्हेची मदत करावी," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.


भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत अमित शाहांनी जखमींनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत रेल्वेकडून सर्व प्रकारचं सहाय्य केलं जात असल्याचं सांगितलं आहे.



रेल्वेचं स्पष्टीकरण

रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी रात्रीच घटनास्थळावर पोहोचले. ही घटना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर घडली, जिथे लोक रेल्वे रुळावर उभे होते, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्मिता वत्स यांनी दिली.

मदतीची घोषणा
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसंत दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली.