'त्या' वृत्तासाठी भाजपाध्यक्षांचे पुत्र 100 कोटींचा दावा ठोकणार
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2017 09:45 PM (IST)
मी व्यवसाय करताना कायद्याचं पूर्णपणे पालन करतो. मी सहकारी बँकेतून घेतलेलं कर्ज पूर्णपणे कायदेशीर आहे' असा दावा जय शाह यांनी केला आहे.
नवी दिल्ली : भाजपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16 हजार पटींनी वाढल्याचं वृत्त दिल्यानंतर 'द वायर' वेबसाईट अडचणीत येण्याची शक्यता आहे. उलाढालीसंदर्भात खोटं वृत्त दिल्याचा आरोप करत जय शाह यांनी द वायर विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी दर्शवली आहे. 'माझ्या संदर्भात एका वेबसाईटने खोटी बातमी दिली आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा खटाटोप आहे. माझे वडील अमित शाह यांच्या राजकीय वर्चस्वामुळे मला व्यवसायात यश मिळालं, असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र मी व्यवसाय करताना कायद्याचं पूर्णपणे पालन करतो. मी सहकारी बँकेतून घेतलेलं कर्ज पूर्णपणे कायदेशीर आहे' असा दावा जय शाह यांनी केला आहे. जय शाह यांच्यावर आरोप झाल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एका पत्रकार परिषदेत सर्व आरोप धुडकावून लावले होते. 'द वायर' या वेबसाईटने जय अमित शाह यांची कंपनी 'टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' विषयी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. 'द वायर'चं वृत्त काय? जय शाह यांच्या कंपनीच्या बॅलन्सशीटनुसार 2013-14 मध्ये कंपनीकडे कुठलीही अचल संपत्ती किंवा स्टॉक्स नव्हते. इतकंच नाही, तर मार्च 2013 मध्ये कंपनीला एकूण 6 हजार 230 तर मार्च 2014 मध्ये 1 हजार 724 रुपयांचा तोटाच झाला होता. मात्र वडील भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर वेगाने वाढला.