नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर अमित शाह भाजपाध्यक्ष झाल्यानंतर शाह यांच्या मुलाच्या कंपनीचा टर्नओव्हर 16 हजार पटींनी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. 'द वायर' या वेबसाईटने जय अमित शाह यांची कंपनी 'टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' विषयी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे.


जय शाह यांच्या कंपनीच्या बॅलन्सशीटनुसार 2013-14 मध्ये कंपनीकडे कुठलीही अचल संपत्ती किंवा स्टॉक्स नव्हते. इतकंच नाही, तर मार्च 2013 मध्ये कंपनीला एकूण 6 हजार 230 तर मार्च 2014 मध्ये 1 हजार 724 रुपयांचा तोटाच झाला होता. मात्र वडील भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर वेगाने वाढला.

2014-15 या आर्थिक वर्षात कंपनीला 50 हजार रुपयांच्या उत्पन्नावर एकूण 18 हजार 728 रुपयांचा नफा झाला. तर 2015-16 या वर्षात कंपनीची उलाढाल थेट 80.5 कोटी रुपयांवर पोहचली. म्हणजेच 2014-15 च्या तुलनेत 16 हजार पटींनी कंपनीचा टर्नओव्हर वाढला.

ऑक्टोबर 2016 मध्ये जय शाह यांच्या कंपनीने अचानक सगळे व्यवहार बंद केले. कंपनीला गेल्या काही वर्षांत 1.4 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, त्यामुळे कंपनीच्या संपत्तीत घट झाली आहे, असा अहवाल कंपनीच्या संचालकांनी दिला.

टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली होती. जय शाह प्रमाणेच जितेंद्र शाहसुद्धा कंपनीचे संचालक आहेत. अमित यांच्या पत्नी सोनल शाह कंपनीच्या भागीदार आहेत.