बंगळुरु: कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या राज्यावर लक्ष केंद्रीय केलं असून त्याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगळुरुच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये विधानसभेच्या 28 जागा असल्याने भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी म्हणजे 3 मार्च रोजी बंगळुरुच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे बंगळुरु पोलिसांनी वाहतूक मार्गामध्ये मोठा बदल केल्याचं दिसून येतंय.
दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत अनेक मार्ग प्रवाशांसाठी बंद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगळुरुमध्ये येणार असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद केले आहेत. दुपारी 3 ते रात्री 9 या सहा तासांच्या काळात बंगळुरुतील अनेक मार्ग बंद असून त्या ठिकाणी प्रवास करु नये असं आवाहन ट्रॅफिक पोलिसांनी केलं आहे. नागरिकांनी यामध्ये पोलिसांना सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.
काँग्रेसची भाजपवर टीका
केंद्रीय गृहमंत्री बंगळुरु दौऱ्यावर येणार म्हणून पोलिसांनी अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसणार असून त्यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे.
कर्नाटकमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका
कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृ्त्ती जाहीर केली आहे.
दुसरीकडे काँग्रेसनेही या ठिकाणी जोरदार तयारी सुरु केली असून स्थानिक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात दौरे सुरु केले आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे.
ही बातमी वाचा: