गुवाहटी : आसाममध्ये एनआरसीची (नॅशनल रेजिस्टर सिटीझन) अंतिम यादी जारी झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशातील घुसखोरांना बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि देशाला घुसखोरांपासून मुक्त करायचं आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं.


आसाममधील घुसखोरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असताना ते इतर राज्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आसाममधून बाहेर केलेल्या घुसखोरांना इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही, असं आश्वासनही अमित शाहांनी यावेळी दिलं. एनआरसीची यादी जारी झाल्यानंतर अमित शाह गुवाहटी येथे बोलत होते.


अमित शाह पुढे म्हणाले की, आसाममधील काही लोकांना वाटतं की एनआरसीमध्ये त्यांचं नाव चूकून आलेलं नाही, त्यामुळे ते चिंतीत आहे. एनआरसीमधून वगळलेले लोक आपल्या राज्यांमध्ये जाऊ शकतात. तसेत विश्वासाने सांगते की कुणीही घुसखोर आसाममध्ये राहणार नाही आणि इतर राज्यातही ते प्रवेश करु शकणार नाहीत. यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे.


आसाममधील नागरिकांना त्यांची वेगळी ओळख मिळावी आणि बांगलादेशमधून घुसखोरी केलेल्या लोकांमध्ये त्यांना गणलं जाऊ नये, यासाठी एनआरसीची यादी तयार करण्यात आली आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं. एनआरसीची अंतिम यादी 31 ऑगस्टला जारी करण्यात आली होती. अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार 004 लोकांचा समावेश होता. तर 19 लाख 06 हजार 657 लोकांना या यादीतून वगळण्यात आलं आहे.