कोलकाता : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठीच अमित शाह प्रत्येक महिन्यातील तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार आहेत. एबीपी समुहाच्या आनंद बाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाहांनी याबाबत माहिती दिली.

बंगालमध्ये 22 जागा जिंकण्याचं लक्ष्य

प.बंगालमध्ये 22 जागा जिंकण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं अमित शाहांनी म्हटलं. त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, बंगालसारख्या राज्यात इतक्या जागा जिंकणं अवघड आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावर शाह म्हणाले की, “त्रिपुरात भाजपचा विजय होईल असं कुणालाही वाटत नव्हतं. पण तिथे आम्ही जिंकलो.”

प्रत्येक बूथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न

‘राज्यात मिस कॉलच्या माध्यमातून सदस्यसंख्या निर्माण करण्यासाठी मोहीम सुरु आहे. यासाठी आमचा पक्ष प्रत्येक बूथवर पोहोचत आहे. सर्व घटकांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ममता बॅनर्जी केवळ एका विशिष्ट घटकाचं राजकारण करतात,’ असा आरोप अमित शाहांनी केला.

 आम्हाला मोठा पाठिंबा मिळतोय

‘बंगालमधील लोक मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. राज्यात आम्हाला नंबर एकचा पक्ष बनायचं आहे,’ अशी महत्त्वाकांक्षाही शाहांनी बोलून दाखवली.

 NRC वरुन भाजप-ममतांमध्ये संघर्ष

आसामधील 40 लाख नागरिकांचे नाव ‘NRC’तून गायब झाल्याने ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे ममता यांना विरोधकांचा चेहरा बनण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच अमित शाह 11 ऑगस्टला बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत.