जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला ज्या वसाहतीत राहतात, त्यामध्ये एका व्यक्तीने बॅरिकेट तोडून कार आतमध्ये घुसवली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी चालकावर गोळीबार केला. फारुख अब्दुल्ला बठिंडी भागात राहतात.

सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात कार चालकाला गोळ्या लागल्या, ज्यानंतर त्याला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बठिंडी भागात फारुख अब्दुल्ला यांच्याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे इतरही मोठे नेते राहतात. या भागात चौफेर कडेकोट बंदोबस्त असतो.

या घटनेवेळी फारुख अब्दुल्ला घरात नव्हते. फारुख अब्दुल्ला यांचं घर वसाहतीच्या उजव्या बाजूला आहे. या घटनेला सध्या दहशतवादी घटनेशी जोडता येणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. ही एक घटना असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची प्रत्येक दृष्टीकोनातून चौकशी केली जात आहे.

कोण आहेत फारुख अब्दुल्ला?

फारुख अब्दुल्ला यांचा जन्म 1937 साली झाला. त्यांनी जम्मू-काश्मीरचं मुख्यमंत्रिपद तीन वेळा भूषवलं आहे. सर्वात अगोदर 1982 ते 1984, दुसऱ्यांदा 1986 ते 1990 आणि तिसऱ्यांदा 1996 ते 2002 या काळात ते मुख्यमंत्री होते.

फारुख अब्दुल्ला पहिल्यांदा वडील शेख अब्दुल्ला यांच्यानंतर मुख्यमंत्री झाले. ते माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचे वडील आहेत. फारुख अब्दुल्ला सध्या श्रीनगरमधून लोकसभेचे खासदार आहेत.