नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये तीन दिवसाच्या मुक्कामावरुन सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ''जे लोक प्रश्न उपस्थीत करत आहेत, त्यांना निवडणुकीबद्दल काहीच माहीत नाही. कारण वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मतदार संघात तीन दिवसाचा काळ व्यतित केला,'' असं त्यांनी सांगितलं.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शाह म्हणाले की, ''उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग असो, किंवा अवध, रुहेलखंड, वाराणसी, गोरखपूर सर्वच भागात भाजपला चांगलं यश मिळेल. या निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढवत असून, आमच्या समोर फक्त समाजवादी पक्ष आणि बसपाच आहेत.'' असंही ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीवरुनही जोरदार टीका केली. अमित शाह म्हणाले की, ''समाजवादी पक्षाने ज्या दिवशी काँग्रेससोबत हातमिळवणी केली, त्याच दिवशी त्यांनी आपला पराभव मान्य केला. कारण, पाच वर्ष काम करुनही जर तुम्हाला तुमचा वैचारिक विरोधक असलेल्या पक्षासाठी 100 जागा द्याव्या लागत असतील, तर तुमच्या मनात विजयाबद्दलचा विश्वास डळमळीत असतो.'' असा टोलाही लगावला.
दरम्यान, उद्या 8 मार्च रोजी शेवटच्या टप्प्यात पूर्वांचलमधील 40 जागांसाठी मतदान होत आहे. या भागातून 2012 मध्ये समाजवादी पक्षाला 23. बसपा 5, भाजपा 4, काँग्रेस 3 आणि इतर 5 जागांवर विजयी झाले होते.
या 40 पैकी वाराणसीत एकूण 8 जागा असून, 2012 मध्ये यातील 5 पैकी 3 जागांवर वर्चस्व सिद्ध करता आलं होतं. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या सर्व जागांवर भाजपनेच आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती भाजप करेल का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं बोललं जातंय. भाजपला इथे पुन्हा निर्विवाद वर्चस्व मिळेल अशी आशा आहे. मात्र, दुसरीकडे बसपा सुप्रीमो मायावती सर्वांचेच दावे खोडून काढत आहे.
संबंधित बातम्या
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या!
वाराणसीत मोदींचा रोड शो, सुरक्षेच्या कारणांकडे दुर्लक्ष?
BLOG : इलेक्शन डायरी : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी?
वाराणसीत पंतप्रधान मोदींचा 7 किमीचा मेगा रोड शो