नवी दिल्ली : भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतः लाज वाटेल असा समाज तयार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अमित शाह बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले आणि इंग्रजी भाषेवरील अवलंबित्वावर टीका केली.
भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. आपण आपल्या भाषिक वारशाचा अभिमान बाळगण्याची आणि त्याचा जागतिक स्तरावर गौरव करण्याची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले. तसेच इंग्रजीवर अवलंबित्व असलेल्यांवर त्यांनी टीका केली.
Amit Shah Speech : इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल
अमित शाह म्हणाले की, "भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे. लवकरच असा समाज निर्माण होईल ज्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल. ज्यांना वाटते की हा बदल शक्य नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की बदल दृढनिश्चयी लोकच घडवतात. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीची शान आहे."
English Language : भारत समजून घेण्यासाठी इंग्रजी अपुरी
परदेशी भाषा भारत समजून घेण्यासाठी अपुरी आहे असं म्हणत अमित शाहांनी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर टीका केली. परदेशी भाषा या भारताच्या इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी पुरेशा नाहीत असं अमित शाह म्हणाले.
अर्धवट परदेशी भाषांद्वारे भारत कधीच समजला जाऊ शकत नाही. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की आपण ती जिंकू. आपण आपल्या भाषांमध्ये देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू असा आत्मविश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
Panch Pran : 'पंच प्राण' भारताच्या अमृतकालाचे संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंच प्राण' संकल्पांचा उल्लेख करत शहा म्हणाले की, हे 130 कोटी भारतीयांचे ध्येय बनले पाहिजे. या पाच संकल्पांद्वारे 2047 पर्यंत भारत जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि त्या प्रवासात भाषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.
1. विकसित भारताचे स्वप्न
2. गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती
3. आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान
4. राष्ट्रीय एकता व अखंडतेबद्दल समर्पण
5. प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यभावना
प्रशासकीय प्रशिक्षणात सहानुभूतीची गरज
शाह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणप्रणालीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आजही ब्रिटिशकालीन मानसिकतेतून तयार झालेली व्यवस्था सहानुभूतीचा अभाव बाळगते. प्रशासक जर सहानुभूतीशिवाय निर्णय घेत असेल, तर तो प्रशासनाचा खरा उद्देश साध्य करू शकत नाही असे ते म्हणाले.
साहित्य म्हणजे संस्कृतीचा आत्मा
गृहमंत्र्यांनी साहित्याचे महत्त्वही अधोरेखित केले. "जेव्हा देश अंधारात होता, तेव्हा साहित्याने धर्म, स्वातंत्र्य आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली. साहित्य हे समाजाचे आत्मबळ आहे. सत्तांमध्ये बदल झाले, पण जेव्हा जेव्हा साहित्याला दडपण्याचा प्रयत्न झाला तेव्हा समाजाने संघर्ष केला."
ही बातमी वाचा: