नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बंगारु लक्ष्मण, नितीन गडकरी या भाजपच्या माजी अध्यक्षांचा आदर्श घेऊन अमित शाहांनी आता आरोपानंतर तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

नितीन गडकरी हे अध्यक्ष असताना त्यांच्यावर पूर्ती कंपनीतल्या गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यावर गडकरींनी तातडीने राजीनामा दिला. या प्रकरणी पुढे कुठली केसही चालली नाही. जर भाजप केवळ आरोपानंतर गडकरींचा राजीनामा घेऊ शकते, तर त्यांनी आता अमित शाहांचाही नैतिकदृष्ट्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात 16 हजार पटींनी कशी वाढली, याबद्दलचं वृत्त ‘द वायर’ या वेबपोर्टलने दिलं होतं. या स्फोटक बातमीनंतर राजधानी दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अवघ्या 50 हजार रुपयांचा टर्न ओव्हर असलेली कंपनी एका वर्षात 16 हजार पटींनी आपली उलाढाल कशी काय वाढवू शकते, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. असा काही मूलमंत्र असेल तर तो स्टार्ट अप इंडिया योजनेत संघर्ष करणाऱ्या तरुणांना देऊन त्यांना उन्नती मार्गावर न्यावं असा टोला लगावला आहे.

भाजपमधल्या राजीनाम्याच्या इतिहासाचीही आठवण काँग्रेसने करुन दिली. जैन डायरीत केवळ नाव आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे तातडीने पदावरुन दूर झाले. बंगारु लक्ष्मण हे कॅमेऱ्यात लाच घेताना आढळल्यावर त्यांनाही पद गमवावं लागलं होतं. अगदी ताजं उदाहरण हे नितीन गडकरींचं आहे. गडकरींनाही पूर्तीमध्ये केवळ आरोपांवरुन राजीनामा द्यावा लागला होता. भाजपमधली ही परंपरा लक्षात घेऊन आता अमित शाहांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने आज दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केली.