नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळात नंबर 2 नेमकं कोण आहे? मोदींचा उजवा हात समजले जाणारे अमित शाह की राजनाथ सिंह? मंत्रिमंडळाच्या निर्मितीपासूनच जी चर्चा सुरु झाली त्यावर कॅबिनेट कमिटीच्या नियुक्त्यांनी शिक्कामोर्तब केलं. आठ पैकी आठही कॅबिनेट समित्यांवर अमित शाह आणि राजनाथ सिंह मात्र केवळ दोनच समित्यांवर. काल पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी पीआयबीच्या वेबसाईवटर या कमिट्या जाहीर झाल्या. राजनाथ सिंह यांना दुर्लक्षित केल्याच्या बातम्या मीडियात सुरु झाल्या आणि अवघ्या 16 तासांतच या समित्यांची पुर्नरचना जाहीर करण्यात आली. आधी दोनच समित्यांमध्ये स्थान असणाऱ्या राजनाथ यांना चार समित्या वाढवून एकूण सहा समित्यांवर स्थान देण्यात आलं.
अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हाच हे नक्की झालं होतं की ते मंत्रिमंडळाचे अघोषित नंबर 2 असणार. पहिल्या टर्ममध्ये अमित शाह मंत्रिमंडळात नव्हते, त्यामुळे हा मान राजनाथ सिंह यांच्याकडे राहिला होता. पण त्यावेळचा राजनाथ सिंह यांचा नंबर 2 आणि सध्याचा अमित शाह यांचा नंबर 2 यात खूप फरक आहे. राजनाथ सिंह म्हणायला नंबर 2 असले तरी त्यांना स्वत:च्याच गृहखात्यात फार कमी वाव होता. हे खातं अजित दोभालच चालवतात अशी चर्चा असायची. पण अमित शाह यांच्या काळात मात्र तसं चित्र नाही.
शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींनंतर दुसरी शपथ घेतली ती राजनाथ यांनी, त्यानंतर अमित शाह असा क्रम होता. प्रथेनुसार पंतप्रधानांच्या नंतर शपथ घेणारा मंत्री हा नंबर 2 मानला जातो. पंतप्रधान विदेशात असताना कॅबिनेट मीटिंग घ्यायची वेळ आली किंवा महत्त्वाचा राजकीय निर्णय करावा लागला तरी राजकीय व्यवहार कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनाच स्थान दिलं जातं. त्यामुळेच ज्या राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या नंबरवर शपथ घेतली, त्यांना केवळ दोनच कॅबिनेट कमिट्यांमध्ये स्थान दिलं जाणं याची मीडियात खूप चर्चा झाली. विशेष म्हणजे राजकीय व्यवहार कमिटीतही आधी त्यांना स्थान दिलं नव्हतं.
अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत खासदार झाले आहेत, केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. मंत्री नसतानाही देशाच्या राजकीय व्यवस्थेत मोदींनंतर त्यांनाच नंबर 2 म्हणून पाहिलं जात होतं.
2014 मध्ये अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह यांचीच जागा घेतली होती, त्यानंतर नवे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी राजनाथ सिंह यांची जागा घेतली. मंत्रिमंडळाच्या अधिकृत क्रमवारीत राजनाथ सिंह 2 नंबरवर आणि अमित शाह 3 नंबरवर असले तरी अधिकाराने अमित शाह हेच नंबर 2 असणार हे आता दिसू लागलं आहे. विशेष म्हणजे निवडणुकीआधी ज्या नितीन गडकरींच्या नावाची खूप चर्चा असायची, त्यांनाही या नंबर 2 च्या रेसमध्ये बाजूला ठेवलं आहे.
अमित शाह- मोदींच्या मंत्रिमंडळातले अघोषित नंबर 2
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2019 03:26 PM (IST)
मोदींचा पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा शपथविधी झाला आणि इकडे मंत्रिमंडळात नंबर 2 साठी एक अदृश्य रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसतं आहे. अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्याच क्षणी आता त्यांचा रोल नंबर 2 च असणार ही चर्चा सुरु होती. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या नियुक्त्यांमधेही त्याचीच झलक पाहायला मिळतेय.
NEW DELHI, INDIA - AUGUST 9: Union Home Minister Rajnath Singh, Prime Minister Narendra Modi and Bharatiya Janata Party National President Amit Shah during the BJP National Council meeting at Jawaharlal Nehru Stadium on August 9, 2014 in New Delhi, India. Leaders of India's ruling Bharatiya Janata Party called on followers to gear up for key state elections in order to extend the Hindu nationalist movement's grip on the country. (Photo by Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images via Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -