पालघर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून पालघरमध्ये अमित आणि विकास झा या दोन भावांनी आत्महत्या केल्यानंतर, आता त्यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्येची धमकी दिली आहे. ज्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून अमित आणि विकास झा या दोन्ही भावंडांनी आत्महत्या केली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

10 नोव्हेंबर 2017 रोजी विकास झा या तरुणाने वसईच्या उपविभागीय कार्यालयात केरोसीन ओतून जाळून घेतलं होतं. पोलिसांच्या त्रासाला आणि सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विकासच्या कुटुंबीयांनी केला होता.

विकास झाच्या आत्महत्येला अडीच महिन्याचा कालावधी उलटला असतानाच त्याचा धाकटा भाऊ अमित झाने विषप्राशन करुन आयुष्य संपवलं. आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून विकासचा धाकटा भाऊ अमित झा गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे घालत होता. पण पालघर पोलीस भावाला न्याय देत नसून उलट चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देतात, असा आरोप करत अमित झा यानेही औषध प्राशन केलं होतं.

अमित आणि विकासच्या मृत्यूला स्थानिक पुढारी मुनाफ बलोच, मिथीलेश झा, अमर झा आणि पोलिस निरिक्षक युनूस शेख हे कारणीभूत असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. मात्र, पोलिसच गुन्हेगार असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे आता आम्ही संपूर्ण कुटुंब आत्महत्या करु, अशी धमकी कुटुंबीयांनी दिली आहे.

दरम्यान, अमितच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पुढारी मुनाफ बलोच, मिथिलेश झा, अमर झा आणि पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील पोलीस निरीक्षक युनूस शेख आणि मुनाफ बलोच यांना पकडण्यात अजून पोलिसांना यश आलं नाही. तर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी यांना वाचवण्याची धडपड पोलिसांची चालू आहे.

संबंधित बातम्या

अमित झा आत्महत्या : पोलिस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्त्यासह चौघांवर गुन्हा

भावाच्या आत्महत्येनंतर अडीच महिन्याने धाकट्या भावानेही आयुष्य संपवलं